वेस्टइंडिजचा भारतावर ८ गडी राखून दणदणीत विजय

तिरूवनंतपुरम : लेंडन सिमन्सच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर वेस्टइंडिजने भारतावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह वेस्टइंडिजने तीन सामन्याच्या टी-२० मालिकेत १-१ ने बरोबरी साधत मालिकेतील आव्हान जिंवत ठेवले आहे.

विजयासाठीचे १७१ धावांचे आव्हान विंडीजने १८.३ षटकांत २ बाद १७३ धावा करत पूर्ण केले. आजच्या सामन्यातही भारताचे गच्छाळ क्षेत्ररक्षण पहायला मिळाले. भारताने दोन झेल सोडले. विंडीजकडून लेंडन सिमन्सने ४५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारासह नाबाद ६७ धावा केल्या, तर निकोल्स पूरनने १८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारासह नाबाद ३८ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. शिमरन हेटमायरने १४ चेंडूत २३ आणि एविन लुईसने ३५ चेंडूत ४० धावा करत महत्वपूर्ण कामगिरी बजावली. भारताकडून गोलंदाजीत वाॅश्गिंटन सुंदर आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी १ गडी बाद केला.

तत्पूर्वी, वेस्ट इंडिज कर्णधार कायरन पोलार्ड याने नाणेफेक जिंकून भारतीय संघास प्रथम फलंदाजीसाठी पाचरण केलं होतं. भारताची सुरूवात खराब झाली. ३.१ षटकात संघाची धावसंख्या २४ असताना खॅरी पिएरने हेटमायरकरवी लोकेश राहुलला झेलबाद करत भारतीय संघास पहिला झटका दिला. राहुल ११ धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेला रोहित शर्मा दुस-या सामन्यातही अपयशी ठरला. रोहितला होल्डरने १५ धावावर त्रिफळाचित केल.

त्यानंतर शिवम दुबेने आक्रमक खेळ करत अर्धशतक पूर्ण केल. दुबेने ३० चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारासह ५४ धावाची खेळी केली. शिवम दुबे बाद झाल्यानंतर कोहली पहिल्या सामन्यासारखी खेळी करेल अस वाटत होतं पण त्याला केसरिक विल्यम्सने १९ धावांवर सिमन्सकरवी झेलबाद केलं. त्यानंतर रिषभ पंतने २२ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ३३ धावा करत संघाची धावसंख्या २० षटकात १७० पर्यत नेली. जडेजाने ९ तर श्रेयस अय्यरने १० धावा केल्या.

वेस्ट इंडिजकडून गोलंदाजीत केसरिक विल्यम्स आणि हेल्डन वाॅल्शने प्रत्येकी २ गडी बाद केले. तर शेल्डन काॅट्रेल, जेसन होल्डर आणि खॅरी पिएरने प्रत्येकी १ गडी बाद केला.

Leave A Reply

Your email address will not be published.