पंढरपूर – कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी गेलेला श्री पांडुरंगरायाच्या पालखी सोहळा आज श्री क्षेत्र पंढरीत दाखल होत आहे. दरम्यान या सोहळ्याचे शेवटच्या वेळापूर मुक्कामी मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
श्री पांडुरंगरायाचा पालखी सोहळा रविवार (दि . ५ डिसेंबर) रोजी श्री क्षेत्र आळंदीहून श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. पुणे, सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण, नातेपुते मार्गे मजल दरमजल करीत हा सोहळा शनिवारी वेळापूर मुक्कामी पोहोचला. सायंकाळी तोफांची सलामी देवून या सोहळ्याचे स्वागत श्री महादेव देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अमृतराज माने देशमुख, विश्वस्थ पांडुरंगराव माने देशमुख, सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख, श्री आनंदमूर्ती सेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, सदस्य अजित साठे, महाविर मुंगुसकर आदीनी केले. सायंकाळी आरतीनंतर सोहळ्याला माळखांबीकरांच्या वतीने अन्नदान करण्यात आले.
या सोहळ्यात हभप प्रभू महाराज वासकर, गोपाळ देशमुख, पांडुरंग बुरांडे यांच्यासह भाविक सहभागी झाले होते. उद्या ( रविवारी ) हा सोहळा भंडीशेगाव मार्गे सायंकाळी पंढरपूर मुक्कामी पोहोचेल.