पुणे महापालिकेच्या सभासद पोर्टल फक्त कर्मचाऱ्यांसाठीच
2007 नंतरच्याच सभासदांचीच माहिती पोर्टलवर उपलब्ध
पुणे – महापालिकेच्या इतिहासाचे जतन व्हावे तसेच महापालिकेत जनसेवक म्हणून काम केलेल्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची माहिती एका क्लीकवर पुणेकरांना उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेकडून सभासद माहिती पोर्टल सुरू केले आहे. मात्र, पालिकेच्या स्थापनेपासूनची माहिती नसल्याने 2007 नंतरच्या सभासदांचीच माहिती या पोर्टलवर उपलब्ध असून तीही केवळ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाच पाहता येते. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असून ही माहिती सर्वांसाठी खुली करावी, अशी मागणी केली जाते.
महापालिकेच्या स्थापनेपासून शहराच्या विकासासाठी हातभार लावलेल्या महापालिकेच्या गेल्या 70 वर्षांतील सभासदांची माहिती पुणेकरांना एका क्लीकवर व्हावी यासाठी महापालिकेचे नगरसचिव सुनील पारखी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते. त्यांची ही संकल्पना अखेर पालिकेच्या 70 व्या वर्धापनदिना निमित्त प्रत्यक्षात उतरली तसेच पालिकेने मागील महिन्यात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत हे माहिती पोर्टल सुरू केले. मात्र, प्रशासनाकडून केवळ सध्या गेल्या दहा वर्षांचीच माहिती संकेतस्थळावर अपलोड केली आहे. त्यातही या संकेतस्थळ पाहण्याचे अधिकार केवळ पालिका कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ही माहिती पाहता येत नसल्याचे चित्र आहे.
रेकॉर्डच नाही…
महापालिकेच्या स्थापनेपासूनचे रेकॉर्ड प्रशासनाकडून या माहिती पोर्टलवर अपडेट केले जाणार आहे. त्यात त्यांचे फोटो, त्यांनी भूषविलेली पदे, शहरासाठी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवक म्हणून घेतलेले महत्त्वाचे निर्णय याची माहिती दिली जाणार आहे. मात्र, पालिकेकडे मागील अनेक वर्षांचे रेकॉर्डच नसल्याचे समोर आले आहे. पालिकेकडे महापौर तसेच इतर पदाधिकाऱ्यांकडे रेकॉर्ड ठेवण्यासाठी जागाच नसल्याने त्यांच्याकडून हे सगळे रेकॉर्ड संबंधित पदाधिकारी किंवा त्यांच्या नातेवाईकांकडे देण्यात आले आहे. त्यामुळे या पोर्टलवर आवश्यक असलेली माहिती संकलीत करण्यासाठी सर्व नगरसेवकांना पत्र पाठविण्यात येत आहेत.