पैसे उपलब्ध होतील, तशी कालव्यांची कामे करू : छगन भुजबळ

राहात्यात घेतली कालवा सल्लागार समितीची बैठक

राहाता (प्रतिनिधी) – करोना महामारीमुळे राज्य सरकार अडचणीत सापडले आहे. पैशांअभावी गोदावरी कालव्यांचे काम थांबले आहे. जसे पैसे येतील तसे टप्प्याटप्प्याने या कालव्यांचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम हाती घेतले जाईल. तसेच गोदावरी कालवा सल्लागार समितीचा अध्यक्ष, या नात्याने प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसाठी पाणी मिळालेच पाहिजे, ही आपली भूमिका आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले.

राहाता येथे जलसंपदा विभागाची कालवा सल्लागार समितीची बैठक भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आ. आशुतोष काळे, आ. लहू कानडे, आ. माणिक कोकाटे, खा. सदाशिव लोखंडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अलका आहेरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, विविध विभागांचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, घाटमाथ्यावरील गुजरात व समुद्रात वाहून जाणारे पाणी डोंगरातून बोगदा करून धरण क्षेत्रात आणले, तर नाशिक, नगर जिल्ह्यांसह मराठवाडा परिसरात पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही. सर्वच विभागांत माणसे कमी असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक वर्षांपासून भरती नाही. शेतकऱ्यांना रब्बीसाठी एक व उन्हाळ्यासाठी तीन आवर्तने देण्यासाठी जलसंपदा विभागाने नियोजन करावे, अशाही सूचना त्यांनी केल्या.

आमदार विखे पाटील म्हणाले, राज्याच्या समान पाणी वाटप कायद्याने शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. त्यामुळे कारखानदारी अडचणीत आली आहे. ऊस बाहेर जावून आणावा लागत आहे. कालवा दुरुस्त करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. यासाठी नाबार्ड योजनेतून पैसा मिळविला पाहिजे. पाणी प्रश्‍नासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. भुजबळ हे पाणीवाटप समितीचे अध्यक्ष आहेत. ते पाणी प्रश्‍नाबाबत जे काही निर्णय घेतील, ते आम्हाला सर्वांना मान्य राहील.

यावेळी आ. माणिक कोकाटे, आ. लहू कानडे, खा. सदाशिव लोखंडे, आ. आशुतोष काळे व शेतकरी यांनी गोदावरी कालवा व आवर्तनाबाबत विविध सूचना जलसंपदा विभागाला केल्या. प्रास्ताविक उपअभियंता निसाळ यांनी केले, तर आभार राहाता जलसंपदा विभागाचे अभियंता गायकवाड यांनी मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.