सातारा: जिल्ह्यात बाधितांचे प्रमाण घटले

33 नागरिक करोना संक्रमित; बाधितांच्या मृत्यूमुळे चिंता कायम
सातारा (प्रतिनिधी) –
जिल्ह्यात शनिवारी (दि. 7) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार आणखी 33 नागरिक करोनाबाधित झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी रविवारी दिली. एका बाजूला बाधितांची संख्या घटली असली तरी त्या तुलनेत गेल्या 24 तासांमधील करोनाबळींची संख्या अधिक आहे.

जिल्ह्यात करोनाबाधितांची एकूण संख्या 47 हजार 787 तर करोनाबळींची एकूण संख्या 1610 झाली आहे. या अहवालांमध्ये जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळा, आघारकर, नारी, कृष्णा हॉस्पिटल प्रयोगशाळा यांच्याकडून आलेल्या अहवालांचा समावेश आहे. त्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांचा समावेश नसल्याने ाधितांच्या आकड्यात अचानक मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. 265 चाचण्यांच्या अहवालांमध्ये 32 पॉझिटिव्ह असून बाधितांची टक्‍केवारी 12.08 अशी आहे. बाधितांच्या संख्येच्या तुलनेत सात रुग्णांचा मृत्यू झाला, ही बा चिंताजनक आहे. गेल्या सुमारे महिनाभरात चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) घसरत असला तरी करोनाबळी रोखण्यात आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाला अपयश का येत आहे, हा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. यामागील कारणे शोधून त्यावर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्‍त होत आहे.

सातारा शहरात गुरुवार पेठ व इतरत्र प्रत्येकी एक, सातारा तालुक्‍यातील तामजाईनगर, चिंचणेर, विलासपूर प्रत्येकी एक, कराड तालुक्‍यातील विंग, इंदोली प्रत्येकी एक, फलटण तालुक्‍यातील फलटण शहर, वडजल, चौधरवाडी प्रत्येकी एक, माण तालुक्‍यातील गोंदवले चार, दहिवडी, महिमानगड, बिदाल प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्‍यातील कोरेगाव, तांदुळवाडी, गाळेवाडी, एकसळ प्रत्येकी एक, जावळी तालुक्‍यातील डांगेघर, हातगेघर, कुडाळ प्रत्येकी दोन, वाई तालुक्‍यातील पांडे, धोम कॉलनी प्रत्येकी दोन, बाहेरील जिल्ह्यातील सांगली, कोल्हापूर प्रत्येकी एक, असे एकूण 32 अहवाल करोनाबाधित आले आहेत.

आणखी सात करोनाबळी
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार सुरू असताना जांभे, ता. सातारा येथील 66 वर्षीय पुरुष, नागठाणे, ता. सातारा येथील 66 वर्षीय पुरुष, जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये शनिवार पेठ, सातारा येथील 79 वर्षीय पुरुष, पद्मावतीनगर, ता. फलटण येथील 52 वर्षीय पुरुष, शिंदी, ता. माण येथील 66 वर्षीय पुरुष, बाराटेवाडी, ता. माण येथील 80 वर्षीय पुरुष, दहिगाव, ता. माळशिरस (जि. सोलापूर) येथील 68 वर्षीय महिला, अशा एकूण सात बाधितांचा मृत्यू झाल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.