पुणे – मागील काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वाद सुरु आहेत. यातच आज छगन भुजबळ पुणे दौऱ्यावर आहेत. त्यादरम्यान, स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात जात त्यांना इशारा दिला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. छगन भुजबळांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र न देण्याची भूमिका मांडली. त्यावरून मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
यातच आता पुण्यात छगन भुजबळ यांनी जरा सबुरीने घ्यावं. अन्यथा त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा स्वराज्य संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे. वेळ पडली तर छगन भुजबळ यांची गाडी येथे फुटू शकते. ओबीसी नेत्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या आरक्षणाला नख लावू नये. छगन भुजबळ हे वारंवार वक्तव्य करून दोन समाजांमद्ये वाद लावत आहेत. त्यांनी हे वेळीच थांबवावं, असं म्हणत स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे.
काय म्हणाले होते भुजबळ?
हिंगोली येथे पार पडलेल्या ओबीसी एल्गार सभेत छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध केला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं हे ओबीसी समाजावर अन्याय करणारं आहे. मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी राज्य सरकारने शिंदे समिती स्थापन केली आहे. ही समिती बरखास्त करा, तसेच दोन महिन्यात जे कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत,त्यानां स्थगिती द्या अशी मागणी भुजबळांनी यावेळी केली होती. तसेच सर्वांची जनगणना करा.सर्वांचा सर्व्हे करा आणि मगच मागासलेपण ठरवा असंही भुजबळ यावेळी म्हणाले होते.