वॉशिंग्टन :- अमेरिकेत पहिल्यांदाच हिंदू अमेरिकन संम्मेलन आयोजित केले जाणार आहे. अमेरिकेतील हिंदू समुदायाने एकत्र येऊन आयोजित केलेल्या या संम्मेलनाचे नाव “हिंदू अमेरिकन समिट फॉर पॉलिटीकल एन्गेजमेंट’ असे असणार असून अमेरिकेची संसद असलेल्या कॅपिटलमध्ये या संम्मेलनाचे आयोजन केले जाणार आहे. इतर अनेक मान्यवरांसह अमेरिकेच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे सभापती केविन मॅक्कार्थी हे या संम्मेलनाला संबोधित करणार आहेत.
अलिकडेच स्थापन झालेल्या “अमेरिकन्स फॉर हिंदूज’च्या राजकीय कृती समितीच्या माध्यमातून आणि अन्य 20 सहयोगी संघटनांच्या सहकार्याने या संम्मेलनाचे आयोजन केले जाणार आहे. अमेरिकेच्या कॅपिटल भवनामध्ये दिनांक 14 जून रोजी हे संम्मेलन होणार आहे.
देशभरातील हिंदू समुदायाचे प्रश्न लोकप्रतिनिधींसमोर मांडण्यासाठी या संम्मेलनाचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी देशभरातील 130 पेक्षा अधिक हिंदू नेते या संम्मेलनाला उपस्थित राहण्याची सक्यता आहे. यामध्ये फ्लोरिडा, न्यूयॉर्क, बोस्टन, टेक्सास, शिकागो आणि कॅलिफोर्नियामधील 20 हिंदू संघटना सहभागी होणार आहेत. या संम्मेलनाला उपस्थित राहण्यासाठी काही भारतीय संघटना देखील अमेरिकेमध्ये आपले प्रतिनिधी पाठवणार आहेत.
अमेरिकेतील हिंदू चांगले काम करत आहेत. मात्र राजकीय दृष्ट्या ते खूप मागे आहेत. राजकीयदृष्ट्या हिंदूंना कमी लेखले गेले नाही. मात्र आता परिस्थिती बदलते आहे. कॅलिफोर्नियामध्ये दुर्दैवाने जातीच्या आधारे भेद केला जातो आहे, असे कार्डिओलॉजिस्ट डॉ. रोमेश जोपरा यांनी सांगितले. हिंदूंमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न “इक्वॅलिटी लॅब्ज’ आणि “केअर’ सारख्या संघटना करत आहेत. हिंदू विरोधी कारवाया अशा संस्था करत आहेत. म्हणूनच हिंदू अमेरिकन म्हणून एकत्र येण्याची गरज वाटल्याचेही त्यांनी सांगितले.
सभापती मॅक्कार्थी हे या संम्मेलनाचे बीजभाषण करणार आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाचे काही संसद सदस्य या संम्मेलनाला संबोधित करणे अपेक्षित आहे. अमेरिकेच्या संसदेच्या प्रतिनिधीगृहामध्ये हिंदू अमेरिकनांच्या हिताच्या रक्षणासाठी एक राजकीय गट स्थापन करण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
डझनभर हिंदू संघटनांचा सहभाग…
या शिखर संम्मेलनासाठी अमेरिकन हिंदू कोऍलिशन, अमेरिकन हिंदू फेडरेशन, अमेरिकन्स फॉर इक्वॅलिटी पीएसी, एकल विद्यालय, फेडरेशन ऑफ इंडियन अमेरिकन्स, फाउंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीज, हिंदू ऍक्शन, हिंदू ऍक्शन पीएसी ऑफ फ्लोरिडा, हिंदू पीएसीआर, हिंदू स्वयंसेवक संघ, हिंदू युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका, काश्मीर हिंदू फाउंडेशन, देशभक्त अमेरिका, सेवा इंटरनॅशनल, यूएस इंडिया रिलेशनशिप कौन्सिल आणि वर्ल्ड हिंदू कौन्सिल ऑफ अमेरिका आदी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.