मुंबई – अनेकजण गोव्याला फिरायला गेल्यानंतर येताना सोबत दारू घेऊन येतात. बंदी असतानाही हा प्रकार घडतो. मात्र आता महाराष्ट्र सरकारने कठोर निर्णय घेतला आहे. एक व्यक्ती तीन वेळा गोव्यातून अवैध दारू आणताना निदर्शनास आल्यास त्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हंटले आहे.
गोव्यातून अवैधरित्या आणल्या जाणाऱ्या मद्य वाहतुकीला चाप लावण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना यासंदर्भात कारवाईच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
मंत्री देसाई म्हणाले की, तीन वेळा जर एकाच व्यक्तीकडून अशा पद्धतीचा गुन्हा घडला तर मोक्का लावता येईल का हे तपासून त्यांच्यावर मोक्का लावला जाईल. यासंदर्भात आयुक्तांनाही सूचना दिल्या आहेत. तसेच गोवा आणि सिंधुदूर्गला जोडणाऱ्या छोट्या रस्त्यांवरही तात्पुरत्या स्वरुपासाठी चेकपॉइंट्स उभारण्याच्या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या तुलनेत गोव्यात स्वस्तात दारु मिळते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोव्यातून इतर राज्यात तस्करी होते. महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात गोव्यातून दारु येते. त्याला आता चाप बसणार आहे.
कोल्हापूर उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी सांगितलं की, वारंवार गुन्हा करणाऱ्यांविरोधात मकोकाच्या कलम 93 अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे तस्करीचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होईल. गोव्याहून येणाऱ्या रस्त्यांवर तपासणी केली जाणार आहे.