सोमेश्वरनगर (वार्ताहर): लॉकडाऊनच्या काळात दारु मिळत नसल्याने मद्यपी सैैैरा वैैैरा झाले आहेत. निरा- बारामती राज्यमार्गालगत वडगाव निंबाळकर येथे अज्ञात चोरट्यानी बंद परमीट रुम- बिअरबार फोडत सुमारे आठ लाख रुपयांच्या विदेशी दारुवर डल्ला मारला.
वडगाव निंबाळकर गावच्या हद्दीत राज्यमार्गालगत रामचंद्र कदम यांचे परमिट रुम- बिअरबार आहे. सोमवारी (दि. १३) रोजी ते दुकानाकडे फेरफटका मारण्यास गेले असताना दुकान फोडल्याचे दिसून आले. त्यांनी आतमध्ये जात पाहणी केली असता आठ लाख रुपयांची विदेशी दारु चोरीला गेल्याचे दिसून आले. घटनास्थळी तत्काळ वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी पाहणी केली .
बारामती तालुक्यातील दुसरी घटना
लॉकडाऊनच्या काळात दारु दुकानातून दारु चोरून नेल्याचा बारामती तालुक्यात हा दुसरा प्रकार घडला आहे. यापूर्वी १ एप्रिल रोजी शिरष्णे गावच्या हद्दीतील परमीट रुम- बिअरबार फोडत चोरट्यानी सुमारे ५३ हजाराची दारु चोरुन नेली होती. त्यापाठोपाठ आता वडगावमध्ये चोरट्यानी दारु दुकानाला लक्ष्य केले. पहिल्याच चोरीचा तपास अद्याप लागलेला नाही. लॉकडाऊनमुळे पोलिस बंदोबस्तात व्यस्त आहेत. अशा स्थितीत लक्ष ठेवून मद्यपी आपला कार्यभाग साधत आहेत. लॉकडाऊनमध्ये दारु मिळत नसल्याने मद्यपी अस्वस्थ झाले आहेत