वेल्हे येथील सभेत प्रा. बानगुडे पाटील यांचे प्रतिपादन
वेल्हे- गेली चाळीस वर्षे कॉंग्रेसकडे देऊन येथील मतदारांनी विकासाचा मार्ग खुंटवला आहे. भोर विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकून विकासाचा मार्ग मोकळा करा, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले.
भोर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार कुलदीप कोंडे यांच्या प्रचारार्थ वेल्हे येथे आयोजित सभेत प्रा. बानगुडे पाटील बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा शिवसेनाप्रमुख रमेश कोंडे, संपर्कप्रमुख सत्यवान उभे, वेल्हा तालुका प्रमुख शैलेश वालगुडे, भोर तालुकाप्रमुख माऊली शिंदे भाजपा जिल्हा नियोजन समितीचे बाळासाहेब गरुड, भाजप भोर तालुका प्रमुख गणेश निगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
बानगुडे पाटील म्हणाले की, या ठिकाणी राजगड, तोरणा, रायरेश्वर अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या भागात तरुणांना रोजगार उपलब्ध नाही. येथील तरुणांना मुंबई, पुणे या ठिकाणी हमाली करावी लागत आहे. हे दोन्ही तालुके नैसर्गिक सौंदर्याने नटलेली असताना लोकप्रतिनिधींनी पर्यटनस्थळाच्या विकासासाठी वाव दिला नाही. यामुळे विकास करायचा असेल तर सत्तापरिवर्तन होणे गरजेचे आहे. यासाठी कुलदीप कोंडे यांना मत द्या, असे आवाहन त्यांनी केले.