नगर -महापालिकेच्या दोन व्हॉल्वमनला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका जणाविरोधात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय गुप्ता (रा. तापीदास गल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. कोतवाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
महापालिकेचे व्हॉल्वमन तापीदास गल्ली येथे पाणी सोडण्यासाठी गेले होते. तेथे विजय गुप्ता हा आला आणि म्हणाला की तुम्ही पाणी कमी दाबाने का सोडता, आमचा व्हॉल्व तुम्ही व्यवस्थित सोडत नाही. त्याच्या या प्रश्नांवर फिर्यादी म्हणाले, की लाईटच्या अडचणीमुळे मुळा डॅम येथील पंप बंद झाले. अर्ध्या तासात तुमच्या परिसरात पाणी येईल. त्यानंतर गुप्ता याने फिर्यादीला त्याच्या घरी नळ कनेक्शन तपासणीसाठी नेले.
नळ कनेक्शन मात्र व्यवस्थित होते. त्यावेळी गुप्ताने थोडा वेळाआधी काय म्हणाला, असे म्हणत तुझ्याकडे पाहतो म्हणून त्यांना शिवीगाळ केली. मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी आणि त्यांच्याबरोबरील दुसरे व्हॉल्वमन संभार यांना सुद्धा गुप्ता याने दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी हरिभाऊ एकनाथ काळे यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे. शहरात काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. अनेक ठिकाणी पाणी पुरवठा नियमित होत नाही. तसेच काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे तक्रारी वाढल्या आहेत.