Vivek Oberoi – अभिनेता विवेक ओबेरॉयसोबत (Vivek Oberoi) चित्रपट निर्मितीसंबंधित फसवणूक केल्याप्रकरणी “हड्डी’चा कथित निर्माता संजय शहाला (Sanjay Shah) एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
परिमंडळ-10 चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी शहाच्या अटकेला दुजोरा दिला. वांद्रे हॉलिडे कोर्टाने त्याला 7 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
19 जुलै रोजी ओबेरॉयने चित्रपट निर्मितीमध्ये फसवणूक प्रकरणी पोलीस ठाण्यात संजय शाह, नंदिता शाह आणि राधिका नंदा यांच्यासह त्यांच्या कंपनीच्या आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपीच्या भागीदारांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता.
त्यानंतर, शहाला कोर्टातून रिमांडवर घेऊन पोलीस त्याची चौकशी करत आहेत. याप्रकरणी आणखी तीन ते चार जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
विवेक ओबेरॉय आणि त्याची पत्नी प्रियांकाची 1.55 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार होती. एंटरटेनमेंट कंपनी आणि एका सिनेमाच्या निर्मितीसाठी ओबेराय यांना आरोपींनी 1.55 कोटी रुपये गुंतवण्यास सांगितले.
तसेच पैसे गुंतवल्यानंतर यातून प्रचंड आर्थिक फायदा होणार असल्याचंही सांगण्यात आले होते. मात्र कोणत्याही सिनेमाची निर्मिती न करता आरोपींनी ती रक्कम स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरली.
विवेक ओबेरॉयने मुंबईतील एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. कलम 34, 409, 419 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.