मुंबई – राज्यात 2 जुलै रोजी झालेल्या मोठ्या राजकीय भूकंपानंतर अजित पवार यांच्यासह गटातील सर्व नेत्यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेट घेतली. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवादीचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
आज अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, आत्राम मेश्राम आणि अदिती तटकरे हे सर्व वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. नुकतीच राष्ट्रवादीच्या नेत्यांची ही बैठक संपली आहे.
दरम्यान, या बैठकीत काय घडलं हे आता समोर आलं आहे. यावेळी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ शरद पवारांच्या समोर आले आणि विठ्ठला सांभाळून घे रे आम्हाला..!! असं म्हणत थेट पवारांच्या पाया पडले. त्यानंतर जवळपास सर्वच नेत्यांनी पवारांच्या पाया पडत हात जोडले, अशी माहिती मिळाली.
अजित पवार गटाचे मंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. त्यांनी शरद पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. मार्ग काढण्याची देखील विनंती केली. मात्र, त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. हे सर्व नेते अचानक भेटायला आले असल्याचं जयंत पाटील म्हणाले.