क्रुष्णा- कोयना नदीकाठच्या गावांना दक्षता घेण्याचे आवाहन
सातारा (प्रतिनिधी)- कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस असून धरणातील पाणीसाठा ९० टीएमसीपेक्षा अधिक झाला असल्याने नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.
कोयना धरणातून सकाळी साडेआठपासून २५६०४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग चालू आहे. त्यात वाढ करून आज सकाळी ११ वाजल्यापासून कोयना धरणातून एकूण ३५०००क्यूसेकचा पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता एकूण विसर्ग ४०००० क्यूसेक करण्यात येईल. कोयना व कृष्णा नदीकाठच्या सर्वांनी कृपया दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
धरणातील पाणीपातळी २१५१.०९ फूट असून पाणीसाठा ९०.२४ टीएमसी आहे. धरणातील पाण्याची आवक ५९२५८ क्यूसेक आहे. पाणलोट क्षेत्रात सकाळी सात वाजताच्या नोंदीनुसार कोयना १६२, नवजा ३०१ व महाबळेश्वर १८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.