नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आता दोन आठवड्यांसाठी आभासी (व्हर्च्युअल) माध्यमातून न्यायालयीन प्रकरणांची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार दि. 3 जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे. दिल्लीतील करोनाविषाणू आणि त्याचा ओमायक्रॉन प्रकार वाढत असताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कोलकाता उच्च न्यायालयानेही डिजिटल माध्यमातून सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला होता.
सर्वोच्च न्यायालयाने एका परिपत्रकात म्हटले आहे की, सर्व बारच्या सदस्यांना, सर्व संबंधित पक्षांना सूचित करण्यात येते की, करोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराची वाढती प्रकरणे लक्षात घेता, सक्षम अधिकाऱ्याने मानक प्रक्रिया पुन्हा अधिसूचित केली आहे. यामध्ये न्यायालयीन कक्षांमधील सुनावणी दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आली आहे.
हा निर्णय 3 जानेवारी 2022 पासून लागू होईल. पुढील दोन आठवडे सर्वोच्च न्यायालयात कोणतीही प्रत्यक्ष सुनावणी होणार नाही. सुप्रीम कोर्टाचे रजिस्ट्रार चिराग भानू सिंग आणि बीएलएन आचार्य यांनी जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे बार असोसिएशन, याचिकाकर्ते आणि इतर सर्व पक्षांना या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.
Supreme Court decided to shift to the virtual system of hearings from January 3 for two weeks in view of rise in COVID-19 cases pic.twitter.com/djxs12oxXi
— ANI (@ANI) January 2, 2022
सर्वोच्च न्यायालयाने मार्च 2020 पासून सुरू असलेल्या व्हर्च्युअल सुनावणीत सुधारणा करताना गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी परिपत्रक जारी करून आठवड्यातून दोन दिवस बुधवार आणि गुरुवारी प्रत्यक्ष सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. सोमवार आणि शुक्रवारसाठी व्हर्च्युअल सुनावणीचे दिवस निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे प्रत्यक्ष सुनावणीचे दिवसही वाढतील, असा विश्वासही व्यक्त केला जात होता.
परंतु ओमायक्रॉनचा सतत वाढत असलेला संसर्ग आणि गंभीर स्थिती पाहता सोमवारपासून केवळ आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने सुनावणी घेण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले असून ही व्यवस्था दोन आठवडे अशीच राहणार आहे. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील पावले उचलली जातील, असे सांगण्यात आले आहे.