न्यूयॉर्क – विमान प्रवासादरम्यान करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे एका महिलेला विमानाच्या बाथरुममध्येच विलगीकरणात ठेवण्यात आल्याचा मजेशीर प्रसंग नुकताच अमेरिकेत घडला.
मारिसा फोटिओ असे या महिलेचे नाव आहे आणि त्या व्यवसायाने शिक्षिका आहेत. त्या 19 डिसेंबरला शिकागोवरून आईसलॅन्ड येथे जात होत्या, त्यावेळी त्यांना अचानक घशात खवखव जाणवायला लागली. विमानातच रॅपिड अन्टीजेन टेस्टची सोय असल्यामुळे विमानातच ही चाचणी करण्यात आली.
त्यामध्ये त्यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना विमानाच्या बाथरुममध्येच तीन तासांसाठी विलगीकरणात रहावे लागले. त्यांच्यासाठी स्वतंत्र आसनाची सोय होऊ न शकल्यामुळे त्रांना हा त्रास सहन करावा लागला.
विमान प्रवास सुरू करण्याच्या आगोदर एकापाठोपाठ एक पाचवेळा करोना चाचण्या केल्या गेल्या होत्या. सुदैवाने बाकीच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या. मात्र विमानात बसल्यानंतर त्रास व्हायला लागल्याने करावी लागलेली चाचणी पॉझिटिवह आली होती. फोटिओ यांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.