सातारा -डॉक्टर, नर्स यांच्या बरोबरच जिल्हा प्रशासन, पोलीस कर्मचारी तसेच पालिका प्रशासन, पत्रकार व इतर सेवाभावी संस्था देखील करोनाच्या लढाईत प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन सेवा बजावत आहेत. या करोना योद्ध्यांना बळकट ठेवण्यासाठी वाई तालुक्यातील विरमाडे येथील डॉ. पवनकुमार सोनावणे व डॉ. सौ. हर्षदा सोनावणे या दाम्पत्याने पुढाकार घेतला आहे. आयुष्य मंत्रालय प्रमाणित रोग प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या औषधांचे अत्यावश्यक सेवा बाजवणाऱ्यांना मोफत वाटप करून हे डॉक्टर दांपत्य समाजिक बांधिलकी जोपासत आहे.
जगभरात थैमान घातलेल्या करोना विष्णूचा संपूर्ण भारतात प्रादुर्भाव झाला आहे. महाराष्ट्रात तर करोनाने कहर माजविला आहे. सातारा जिल्ह्यातही करोना बाधितांची संख्या सव्वाशेपर्यंत पोहोचली आहे. करोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्स यांच्या बरोबरीने संपूर्ण प्रशासन झटत आहे. पालिकेचे कर्मचारी, पोलीस तसेच पत्रकार रस्त्यावर उतरून स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत.
या योद्ध्यांना करोनापासून दूर ठेवण्यासाठी त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढविणे गरजेचे आहे. जेणेकरून या योद्ध्यांना करोनाचा प्रादुर्भाव होणार नाही. ही गरज ओळखून वाई तालुक्यातील विरमाडे गावचे सुपुत्र आणि सध्या वाई शहरात वैद्यकीय सेवा बजवत असणारे डॉ. पवनकुमार सोनावणे व त्यांच्या पत्नी डॉ. सौ. हर्षदा सोनावणे यांनी पुढाकार घेतला आहे.
आयुष्य मंत्रालय प्रमाणित असणाऱ्या होमिओपॅथी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या औषधांचे करोना योद्ध्यांना मोफत वाटप करण्याचा निर्णय या दाम्पत्याने घेतला आहे. नुकतेच वाई शहरातील पोलीस कर्मचारी, नगर पालिका कर्मचारी, विशेषतः साफसफाई करणारे कामगार यांना या गोळ्यांचे मोफत वाटप या डॉक्टर दाम्पत्याने केले आहे. तसेच पत्रकार बांधवांनाही या रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या गोळ्या या डॉक्टर दाम्पत्याने दिल्या आहेत. यापुढे हे कार्य असेच सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.