उरूळी कांचन – पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मानवी शरीरास बाधक वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपासून “व्हायरल इन्फेक्शन’ची साथ पसरली असून, यात डेंग्यूनेही डोके वर काढले आहे.
परिसरात डास, मच्छर यांचा प्रादूर्भाव वाढल्याने डेंग्यू, टायफॉईड, मलेरिया, थंडी, ताप, खोकला आदींसह विविध प्रकारच्या साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले असून लहान मुलांचे दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. साथीच्या आजारांमुळे खासगी व शासकीय ग्रामीण रुग्णालये रुग्णाच्या गर्दीने फुलून गेले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे अत्याधुनिक फॉंगिंग मशिनचा वापर करून सर्व ग्रामपंचायत हद्दीत धूर फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वातावरणातील बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ढगाळ वातावरण, पाऊस व उन्हासह रात्रीच्या थंडगार हवेमुळे सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप अशा अनेक आजारांमुळे शहरी भागात आजच्या घडीला घरोघरी रुग्ण संख्या वाढीस लागली आहे.
“सर्वसाधारणपणे सध्या थंडी, ताप, व सर्दी आजाराचे रूग्ण अधिक आहे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी व अशक्तपणा पाच दिवसांपेक्षा अधिक असेल तर तातडीने डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू करायला हवेत. पाणी उकळून प्यावे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा. आजार होण्यापेक्षा प्रतिबंध करता येणे अधिक योग्य याकडे नागरिकांनी लक्ष द्यावे. मागील पंधरा दिवसांत व्हायरल फिवरचे रुग्ण 30 ते 40 टक्क्यांनी वाढले आहेत.” -डॉ. समीर ननवरे, श्री गणराज हॉस्पिटल
“अधून मधून पडणाऱ्या पावसामुळे ठिकठीकाणी गवात वाढले आहे. त्यामुळे परिसरात डासांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे अत्याधुनिक फॉंगिंग मशिनचा वापर करुन ग्रामपंचायत हद्दीत धूर फवारणी करावी.” -अमित कांचन, सामाजिक कार्यकर्ते
डेंग्यूची लक्षणे…
- सुरवातीला ताप आणि अंगदुखी होते
- अचानक थंडी वाजून ताप येणे. शरीरावर पुरळ.
- नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव होणे.
- मळमळ, उलटी आणि लघवीद्वारे रक्त येणे.
- सतत तहान लागणे आणि अशक्तपणा
व्हायरल तापाची लक्षणे…
- व्हायरल तापादरम्यान शरीराचे तापमान वाढते. संपूर्ण शरीरात वेदना होतात.
- थंडी वाजणे, खोकला व नाक वाहणे, अशा तक्रारी जाणवणे तीव्र डोकेदुखी.
- काही नागरिकांच्या त्वचेवर पुरळ येण्याची समस्या असू शकते.