वेल्हे – एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी वेल्ह्यात धनगर समाजाने रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी “यळकोट यळकोट’चा जय घोष करीत सरकाराच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक पंचायत समिती येथे धनगर समाज बांधव एकत्र आले होते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली.
पंचायत समितीमार्गे वेल्हे बाजारपेठ ते मेंगाईदेवी चौक असा मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. यावेळी धनगर समाजाच्या वतीने नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. सरकारने अनेकवर्षं धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. सरकारने अंमलबजावणीसाठी मागितलेला कालावधी ही धूळफेक असून प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी धनगर समाजाकडून करण्यात आली.
राज्य घटनेत धनगर समाजाला 36 नंबरला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण आहे. घटनेत धनगरऐवजी धनगड झाले असून, धनगड जमात राज्यात अस्तित्वातच नाही, त्यामुळे धनगर आणि धनगड एकच आहेत. तसे तत्कालीन राज्य शासनाने कोर्टात प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. चौंडी येथे यशवंत सेनेचे पदाधिकारी 19 दिवसांपासून उपोषणास बसले आहे. सरकार बरोबर मुंबई येथील बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे धनगर समाज आंदोलनाच्या पवित्र्यातच आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाची अंमलबजावणी राज्य शासनाने त्यांच्या अधिकारात लवकरात करावी अशी मागणी वेल्हे तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली. यावेळी यशवंत सेना अध्यक्ष शंकर ढेबे, ग्रामपंचायत सदस्य शंकर ढेबे, सरपंच नथूराम डोईफोडे, सरपंच बाळासाहेब मरगळे, माजी उपसरपंच मारुती मरगळे, तुकाराम कोकरे, तुकाराम डोईफोडे, राम डोईफोडे, लक्ष्मण डोईफोडे, बबन ढेबे, राम जानकर, तानाजी मरगळे, माजी उपसरपंच शंकर ढेबे, रामभाऊ कचरे, पांडुरंग कचरे, भरत डोईफोडे, शिवाजी मरगळे, पांडुरंग ढेबे, कोंडीबा ढेबे, संजय हिरवे, रामभाऊ काळे उपस्थित होते.