तेल अवीव: इस्राईलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू यांच्या विरोधात जोरदार आंदोलनांना सुरुवात झाली असून ठिकठिकाणी झालेल्या निदर्शनांनंतर पोलिसांनी आतापर्यंत डझनभर आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
भ्रष्टाचाराचे आरोप आणि करोनाच्या संकटाला हाताळण्यात त्यांना आलेले अपयश यामुळे नेत्यान्याहू यांच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाले आहे.
जेरुसलेममधील नेत्यान्याहू यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर शेकडो निदर्शक जमा झाले होते. तर तेल अवीवमधील खासगी निवासस्थानाबाहेरही शेकडो निदर्शकांनी नेत्यान्याहू यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी घोषणाबाजी केली. काही आठवड्यांपूर्वीच हे आंदोलन भडकले होते. किनारपट्टीजवळील कॅसारेया येथील नेत्यान्याहू यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर शेकडोंच्या जमावाने निदर्शने केली. तेव्हा सुरक्षा रक्षकांनी या जमावाला रोखले होते. जमावाने नेत्यान्याहू यांच्या हकालपट्टीची मागणी करत काळे झेंडेही फडकावले होते.
नेत्यान्याहू यांनी या आंदोलनकर्त्यांना “देशाला अराजक, हिंसाचार आणि तोडफोडीमध्ये ओढू नका.’ असा इशारा दिला आहे. ठिकठिकाणच्या आंदोलकांविरोधात पोलिसांनी बळाचा वापर करायला सुरुवात केली आहे. जमावावर पाण्याचे फवारे मारून त्यांना पिटाळून लावले जात आहे. तर 12 जणांना अटक करण्यात आली आहे. आंदोलकांवर मिरची स्प्रे आणि चाकूने हल्ला करणाऱ्या आणखी दोघांनाही अटक केली गेली आहे. आंदोलनात हिंसाचार भडकावण्याचा हा प्रयत्न असावा, असा संशय आहे.
इस्राईलमध्ये लॉकडाऊन शिथिल करून आता काही अन्य निर्बंध लावले गेले आहेत. या लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारी 20 टक्क्यांनी वाढली आहे. इस्राईलमध्ये करोना रुग्णांची संख्या 61 हजार झाली आहे. तर 464 जणांचा मृत्यू झाला आहे. नेतान्याहू यांच्यावर घोटाळ्यांचा विश्वास भंग आणि लाच स्वीकारल्याचे अनेक आरोप आहेत.