Animal Movie : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ‘तू झुठी मैं मक्कर’ नंतर संदीप रेड्डी वंगा यांच्या आगामी ‘अॅनिमल’ (Animal) चित्रपटात दिसणार आहे. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. चित्रपट निर्मात्यांनी या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा काही दिवसांपूर्वीच टीझर रिलीज केला आहे. चित्रपटाचा प्री-टीझर पाहता रणबीर ‘अॅनिमल’मध्ये दमदार अॅक्शन करताना दिसत आहे.
टीझर आणि गाणं पाहिल्यानंतर रणबीरचे चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट बघत होते. आता अॅनिमल या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आजच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सिनेमाच्या ट्रेलरबद्दल बोलायचे झाले तर वडील आणि मुलाचे अनोखे नाते यात दिसते.
मुलगा वडिलांसाठी कोणत्याही थराला जायला तयार असतो पण त्यालाही वडिलांबद्दल चिडच असते. दोघेही एकमेकांवर रागावतात आणि टोमणे मारतानाही दिसतात. ट्रेलर वरून हा चित्रपट प्रतिस्पर्ध्याची कथा आहे असे दिसते पण कथेचा सुगावा लावणे खूप कठीण आहे. याशिवाय चित्रपटातील रणबीर आणि रश्मिकाचा रोमान्स कधी आंबट तर कधी गोड असल्याचं दिसून येत आहे.
यासोबतच अभिनेता बॉबी देओल फुल फॉर्ममध्ये दिसत आहे. या चित्रपटातील त्याची भूमिका किती खतरनाक आहे, याचा अंदाज ट्रेलरवरून येतो. सुमारे 11-12 सेकंदांच्या ट्रेलरमध्ये तो दिसला आणि तो वरचढ असल्याचं देखील दिसून येत आहे. फरक एवढाच आहे की टीझरच्या शेवटी बॉबीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते पण ट्रेलरच्या शेवटी त्याने लोकांच्या मनात दहशत पसरवली आहे.
हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या 5 भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित, भूषण कुमार निर्मित ‘अॅनिमल’ हा चित्रपट एक उत्कृष्ट कथा आहे. ज्यामध्ये रणबीर कपूरसोबत अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी सारखे स्टार कलाकार देखील दिसणार आहेत.