नवी दिल्ली – भारताची अव्वल दर्जाची खेळाडू विनेश फोगटने पोलंड खुल्या कुस्ती स्पर्धेत सुवर्णवेध घेतला आणि या मोसमातील तिसऱ्या विजेतेपदाची नोंद केली. ती 53 किलो गटात सहभागी झाली होती.
विनेश या 24 वर्षीय खेळाडूने वॉर्सा येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम लढतीत रूकसाना हिच्यावर 3-2 अशी मात केली. तिने या कुस्तीत उत्कृष्ट डावपेचांचा उपयोग केला. तिने उपांत्यपूर्व फेरीत स्वीडनची रिओ ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेती खेळाडू सोफिया मॅटसन हिचा पराभव करीत धक्कादायक निकाल नोंदविला होता. विनेशने या मोसमात स्पेनमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धा व इस्तंबूलमध्ये झालेली यासर दोगु चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सोनेरी कामगिरी केली होती.
विनेशने सांगितले की, पोलंडमधील स्पर्धेत माझ्यापुढे खडतर आव्हान असूनही सुवर्णपदक मिळाल्यामुळे खूप आनंद झाला आहे. सोफियावर मात केल्यानंतर आता आपण अजिंक्यपद मिळवायचेच हे ध्येय डोळ्यासमोर ठेवीत मी नंतरच्या कुस्त्यांमध्ये आत्मविश्वासाने खेळले व त्याचाच मला फायदा झाला. या विजेतेपदामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे. माझ्या या विजेतेपदाचे श्रेय प्रशिक्षक वॉलर अकोस यांना द्यावे लागेल. त्यांनी मला शिकविलेल्या नवीन तंत्रामुळेच मी हे यश पाहू शकले.
विनेशने पुढे सांगितले की, प्रत्येक खेळाडूला ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेचे पदक खुणावत असते. मीदेखील त्या स्वप्नावर जगत आहे. पुढील वर्षी टोकियो येथे ऑलिंपिक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेची पात्रता निश्चित करण्याचे माझे नजिकचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीनेच मी आता खूप मेहनत करणार आहे.