Asian Wrestling Olympic Qualifiers 2024 : कुस्तीच्या मॅटवर विनेशचा शड्डू! एकतर्फी विजयासह मिळविले पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट

Asian Wrestling Olympic Qualifiers 2024 :- भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटने ( Vinesh Phogat ) आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या उपांत्य फेरीतील विजयासह पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले. या स्पर्धेतून ऑलिम्पिक कोटा मिळवणारी ती पहिली आणि एकूण दुसरी कुस्तीपटू आहे.
आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या स्पर्धेत एकही भारतीय कुस्तीपटू अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही, त्यामुळे या स्पर्धेतून कोणीही पात्रता मिळवणार नाही. विनेश तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. आत्तापर्यंत इतर कोणतीही भारतीय महिला कुस्तीपटू एकापेक्षा जास्त वेळा ऑलिम्पिकमध्ये पोहोचलेली नाही. विनेश व्यतिरिक्त, 53 किलो गटात अंतिम पंघालने ऑलिम्पिक कोटा मिळविलेला आहे.
विनेशने महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या लॉरा गनिक्यजीचा 10-0 असा पराभव केला. राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या विनेशने तांत्रिक श्रेष्ठतेच्या जोरावर कझाकच्या कुस्तीपटूविरुद्धचा सामना 4.18 मिनिटांत जिंकला. आता तिचा सामना उझबेकिस्तानच्या अकतेंगे कुनिमजेवाशी होईल, ज्याने चायनीज तैपेईच्या मेंग ह्सुआन हसिहचा 4-2 असा पराभव केला आहे.
विनेशने स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच तिची सर्वोत्तम कामगिरी केली. उपांत्य फेरीपूर्वी झालेल्या दोन सामन्यांतही तिने एकतर्फी विजयाची नोंद केली. आपल्या पहिल्या सामन्यात तिने कोरियन प्रतिस्पर्धी मिरान चेओनचा अवघ्या 67 सेकंदात पराभव केला. त्यानंतर कंबोडियाच्या स्मनांग दितलाही तिने अस्मान दाखविले.
T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप खेळण्याबाबत दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य…
कुस्तीपटूंच्या अंदोलनाचा प्रमुख चेहरा
विनेश फोगट गेल्या एक वर्षापासून चर्चेत आहे. बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्यासोबत तिने भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर एका तरुण कुस्तीपटूचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करताना अंदोलन छेडले होते. ज्याचे पडसात देशभर उमटले होते.





