पिंपरी, दि. १४ – भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी विनय कुमार चौबे यांनी शहर पोलीस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. मावळते आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडून चौबे यांनी पदभार घेतला.
भारतीय पोलीस सेवेतील ३० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंगळवारी (दि. १३) बदल्या झाल्या. त्यामध्ये पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नाशिक पोलीस आयुक्त येथे बदली झाली. तर राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विनय कुमार चौबे यांची पिंपरी चिंचवड येथे आयुक्त पदी बदली झाली.
सन २०२० मध्ये विनय कुमार चौबे यांना अपर पोलीस महासंचालक पदी बढती मिळाली आहे. मुंबई येथे अनेक वर्ष कामाचा त्यांचा अनुभव आहे. सध्या ते राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक म्हणून काम पाहत होते. तिथून त्यांना पिंपरी-चिंचवड शहराची जबाबदारी देण्यात आली आहे. चौबे हे सन १९९५ च्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी आयआयटी कानपुर येथून शिक्षण पूर्ण केले आहे. शहराला मिळालेले ते पाचवे पोलीस आयुक्त आहेत.
अपर पोलीस महासंचालक विनय कुमार चौबे यांची पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराला पुन्हा एकदा अपर पोलीस महासंचालक दर्जाचे पोलीस आयुक्त मिळाले आहेत. पोलीस आयुक्तालय स्थापनेच्या वेळी शहराचे पोलीस आयुक्त म्हणून अपर पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी बसतील असे सांगण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या दोन आयुक्तांची नेमणूक देखील झाली. मात्र कृष्णप्रकाश यांच्या बदलीवेळी या पदामध्ये बदल करत पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी पोलीस आयुक्त म्हणून शहरात आले. त्यानंतर अंकुश शिंदे हे देखील पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी मिळाले होते.