सातारा -यशवंतनगर (ता. वाई) ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संजय गोरखनाथ भोसले यांच्यावर कामकाजात हलगर्जीपणा करुन अनियमितता केल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी भोसले यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांमध्ये ऍपवर चुकीची माहिती भरल्याचा ठपका ठेवत पाटण तालुक्यातील शिक्षकावर नुकतीच श्री. खिलारी यांनी निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर यशवंतनगर ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ग्रामविकास अधिकारी संजय भोसले यांच्या कामकाजाबाबत असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांची वाई पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. या अहवालानुसार श्री. भोसले यांनी कामकाजात हलगर्जीपणा व अनियमितता केल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यानुसार ज्ञानेश्वर खिलारी यांनी ग्रामविकास अधिकारी भोसले यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले आहे. निलंबन कालावधीत भोसले यांचे मुख्यालय पंचायत समितीचे कोरेगाव असणार आहे. दरम्यान, वाई तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या यशवंतनगर ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईमुळे ग्रामसेवकांना धडकी बसली आहे. ग्रामसेवकांच्या कारभाराबाबत ग्रामीण भागात अनेक तक्रारी असून चुकीचे वागणाऱ्यांना श्री. खिलारी यांनी जोरदार दणका दिला असून पुढचा नंबर कोणाचा याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.