पुणे – पुणे-बेंगलोर महामार्गावर चांदणी चौकात पूलाचे काम अंतीम टप्प्यात आल्याने या ठिकाणी महामार्गावर होत असलेली कोंडी जवळपास फुटली आहे. मात्र, ही कोंडी आता वारजेच्या दिशेला सरकली असून वारजे येथील नदीवर असलेला पूल दोन लेनचाच असल्याने त्यातच पूलाच्या परिसरात कामे सुरू असल्याने हा पूल वाहतूक कोंडीचे कारण (“बॉटल नेक) बनला आहे. परिणामी, डुक्कर खिंड ते वडगाव पूलापर्यंत दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. सकाळी आणि संध्याकाळी वर्दळीच्या वेळी एक किलोमीटर अंतरासाठी तब्बल अर्धा ते पाऊण तास वाहने कोंडीत अडकत आहेत.
दुचाकींची सर्वाधिक वर्दळ…
या पूलामुळे वारजे ते सिंहगड रस्ता हे अंतर अवघ्या दोन ते तीन मिनिटांवर असल्याने सिंहगड रस्ता, धायरी, आंबेगाव, नऱ्हे तसेच कात्रजकडून हिंजवडी, सूस, पाषाण, बालेवाडीकडे खासगी कार्यालयात कामासाठी जाणाऱ्या वाहनांची वर्दळ सर्वाधिक आहे. यामध्ये चारचाकी पेक्षा दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे. त्यातच, मोठी वाहने मध्येच असल्याने तसेच विरूद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे गेल्या काही दिवसांत या ठिकाणी छोट्यामोठ्या अपघातांची संख्याही वाढली आहे.
चार लेनची वाहतूक, पूल दोन लेनचाच…
वारजे येथील पूल महामार्गाच्या रूंदीरणापूर्वी बांधलेला आहे. त्यामुळे हा पूल दोन्ही बाजूंनी केवळ दोन लेनचा आहे. तर डुक्कर खिंड ते वारजे पूल आणि वडगाव ते वारजे पूल दोन्ही बाजूंनी हा महामार्ग प्रत्येकी तीन लेनचा आहे. त्यातच, दोन्ही बाजूला पुन्हा एक-एक सेवा रस्ता पूलावरच येऊन मिळतो. त्यामुळे चार लेन मधून येणारी वाहतूक या पूलावर दोन लेनमध्ये येऊन थांबते. यातून पूलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. पूलावरून चांदणी चौकाच्या दिशेने जाताना तसेच कर्वे रस्त्यावरून पुन्हा महामार्गाकडे येताना दोन्ही बाजूला सेवारस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मोठी वाहने अडकून पडल्यास महामार्गावर वाहनांच्या रांगा लागत आहेत.