पुणे -कर्नाटक राज्यात कॉंग्रेसचे सरकार बहुमताने सत्तेत येईल. तसेच येणाऱ्या काळात राजस्थानच्या निवडणुका असून, येथेही पुन्हा कॉंग्रेसला सत्ता मिळेल, असा विश्वास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्यक्त केला. पुण्यात भारती विद्यापीठाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री गेहलोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेहलोत म्हणाले, राजस्थानच्या सरकारने पाच वर्षात विविध विकासकामे, कल्याणकारी योजना राबविल्या. गरीब जनतेसाठी मोफत आरोग्य विमा, शिक्षणाची सेवा पुरविली. महागाई कमी करण्यात तसेच शिक्षण, आरोग्याच्या बाबतीत राजस्थानने चांगली प्रगती केली. कॉंग्रेसने राजस्थानमध्ये सुशासन दिले. सध्या देशासमोर महागाई आणि बेरोजगारी हे दोन ज्वलंत विषय आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशभरात शिक्षण हक्क कायदा लागू केला. त्याचप्रमाणे देशात आरोग्य हक्क कायदा आणि सामाजिक सुरक्षा हक्क कायदा लागू करण्याची मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. गेहलोत म्हणाले की, मोदींच्या सरकारी कार्यक्रम असल्याने मी त्यांच्या स्वागतासाठी प्रोटोकॉल नुसार हजर होतो. परंतु, कार्यक्रमाला मी उपस्थित नसल्याने ते काय म्हणाले हे मला माहीत नाहीत. मोदी आणि शहा हे दुसऱ्याला दोष देण्यातच समाधान मानत असल्याचे गेहलोत यांनी सांगितले.