मुंबई – ‘हर हर महादेव…’ या गर्जनेशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक लढाईत ही गर्जना म्हणजे लढण्याचं बळ देणारी जणू उर्जाच होती. मराठी मनाला चेतवणारी, रक्त सळसळवणारी ही गर्जना प्रत्येकासाठी जणू एक मंत्रच आहे. आता हीच आरोळ्यांची आणि छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आगामी ‘हर हर महादेव’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे.
नुकतंच या चित्रपटाचा ऑफिशल टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख ‘राज ठाकरे’ यांच्या धीरगंभीर आवाजातील हा टिझर सर्वांच्या पसंतीस उतरला आहे. दरम्यान, ‘हर हर महादेव’ हा अभिजित देशपांडे लिखित-दिग्दर्शित असून, या यावर्षीच दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता लवकरच चित्रपटगृह ‘हर हर महादेव’च्या गर्जनेने दणाणून जाणार आहे, हे नक्कीच.
प्रदर्शित करण्यात आलेल्या टिझर मध्ये राज ठाकरेंच्या आवाजात काही वाक्य ऐकायला मिळतात…’जेव्हा मायमाऊलीची बेअब्रू आणि मंदिराला तडा गुन्हा नव्हता, जेव्हा सह्याद्रीला कणा आणि मराठीला बाणा नव्हता. ही 350 वर्षानंतरच्या पहाटफुटीची गोष्ट आहे. ही अठरापगड आरोळ्यांची आणि माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे..हर हर महादेव..!.