जोशी गेटनेही बायोमेट्रिकद्वारे वाहनांना प्रवेश

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील वाहनांचा ताण कमी करण्यासाठी विद्यापीठात येणाऱ्या जड वाहनांना खडकी स्टेशनकडील जोशी गेटनेच प्रवेश दिला जाणार आहे. या गेटने येणाऱ्या वाहनचालकांना बायोमेट्रिक तपासणी करूनच प्रवेश दिला जाणार आहे.

विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या मुख्य चौकात वाहतुकीचा ताण वाढतो आहे. या प्रवेशद्वाराने विद्यापीठात येणारी जड वाहने व कंत्राटदारांची वाहने यांची नोंद करणे व त्यांना गेट पास देणे शक्‍य होत नाही. या कारणांमुळे आता विद्यापीठात येणाऱ्या जड वाहनांना खडकी स्टेशनकडून विद्यापीठात येताना वापरले जाणारे जोशी गेटने प्रवेश दिला जाणार आहे. त्या ठिकाणी या वाहनांची नोंद करणे आणि त्यांना गेटपास देणे शक्‍य होईल. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणार नाही. ही व्यवस्था पुढील महिन्याभरात अंमलात येईल, अशी माहिती विद्यापीठाचे सुरक्षा संचालक सुरेश भोसले यांनी दिली.

याचबरोबर जोशी गेटमधून आत येण्यासाठीसुद्धा आता बायोमेट्रिक तपासणी करूनच प्रवेश देण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी आयुका गेटकडून येणाऱ्या वाहनचालकांना बायोमेट्रिक तपासणी करूनच प्रवेश देणे सुरू करण्यात आले आहे. आता जोशी गेटने येणाऱ्यांनाही अशाच पद्धतीने प्रवेश दिला जाईल. विद्यापीठाशी संबंधित असलेल्या व्यक्तिंनाच असा प्रवेश दिला जाणार आहे. सुरक्षेच्या आणि वाहतुकीच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही भोसले यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.