नवी दिल्ली – “भारताच्या ‘मिशन शक्ती’मुळे अंतराळात निर्माण झालेला कचरा पुढच्या सहा महिन्यात जळून नष्ट होईल’, असे इस्रो अध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार तपन मिश्रा यांनी म्हटले आहे. आहे. “आपण देशाची मान खाली जाईल असे कुठलेही काम केलेले नाही. आपण जेव्हा एखादे वेगळे काम करतो तेव्हा प्रत्येक वेळीच आपले कौतुक होईलच असे नाही’, असा टोलाही तपन मिश्रा त्यांनी यावेळी लगावला आहे. भारताच्या ‘मिशन शक्ती’मुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) अंतराळवीरांना नवीन धोका निर्माण झाल्याचे नासाने म्हटले होते. या पार्श्वभूमीवर इस्रोकडून हा खुलासा करण्यात आला आहे.
भारतीय शास्त्रज्ञांनी अंतराळातील कृत्रिम उपग्रह पाडणार्या क्षेपणास्त्राची (ए-सॅट) यशस्वी चाचणी केली होती. ‘डीआरडीओ’च्या परीक्षण केंद्रावरून प्रक्षेपित केलेल्या ‘ए-सॅट’ला सुमारे 300 किमी अंतरावरील उपग्रह अवघ्या तीन मिनिटांत लक्ष्य भेदण्यात यश आले आहे. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने भारताच्या या चाचणीबाबत भीती व्यक्त केली होती. ‘भारताची मिशन शक्ती ही मोहीम भयानक असून पाडलेल्या उपग्रहाचे 400 तुकडे अंतराळात पसरले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) अंतराळवीरांना नवीन धोका निर्माण झाला आहे’, असे नासाने म्हटले होते.