पिंपरी, दि. 8 – भोसरी गावातील श्री भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सह्याद्री फाउंडेशन संचालित वीर वाद्यपथकाचे वादन लक्षवेधी ठरले. पथकाने वादनातून “अफजल खानचा वध’ हे नाट्य सादर केले.
हनुमान जयंतीनिमित्त भोसरी गावातील श्री भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त देवाच्या पालखीचे आयोजन केले जाते. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत असतात. तसेच जत्रेचे आकर्षण वाद्य वादन असते. यात वाद्य वादनात भोसरी गावातील अनेक ढोल ताशा पथके आपली कला दर्शवितात. त्यात वीर ढोल ताशा पथकाने महाराष्ट्राच्या इतिहासाचे दर्शन घडवून आणले. त्यात विशेष आकर्षण म्हणून “अफजल खानाचा वध’ हे नाट्य वादनाच्या सहाय्याने सादर केले. त्यास भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
भोसरी जत्रेनिमित्त श्री भैरवनाथ मंदिर उत्सव समितीच्या वतीने शनिवारी व रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. 8) सकाळी श्रींजी महापूजा झाली. त्यानंतर बैलगाडा शर्यत झाली. सायंकाळी श्रींची मिरवणूक काढण्यात आली. बापुजी बुवा चौकापासून ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यात ढोल लेझीम पथक सहभागी झाले होते. सायंकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम झाला.
रविवारी (दि. 9) सकाळी चक्री भजन होईल. भजनी मंडळांना बक्षिसे देण्यात येणार आहे. तसेच मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.