Vasant More – मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे (Vasant More) सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. मराठी माणसाच्या हक्काचा विषय असो वा एखाद्याला मदत करणं असो मोरे आपली प्रत्येक अपडेट सोशल मीडियावरून देत असतात. सोशल मीडियावर देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग असून, त्यांची प्रत्येक पोस्ट नेहमीच ते चर्चेत असते.
मात्र, आता वसंत मोरे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पुणे शहरातून लोकसभा निवडणूक लढवून खासदार होण्याची इच्छा त्यांनी आधीच व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे 10 ऑक्टोंबर रोजी वसंत मोरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असून, यावेळी त्यांना लाल दिव्याची गाडी भेट म्हणून देण्यात आली होती. त्यामुळे खासदारकीसोबत मंत्रीपदाचेही स्वप्न वसंत मोरे यांना पडू लागले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली.
दरम्यान, आता पुणे शहरात ‘भावी खासदार’ म्हणून त्यांचे बॅनर लागले असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभेसाठी मनसेने तयारी केल्याचे दिसून येत आहे. याशिवाय मावळ आणि शिरूर हे मतदारसंघदेखील मनसे लढवणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
पुणे शहर लोकसभेसाठी सक्षम नेतृत्व कार्यसम्राट नगरसेवक वसंत मोरे असा मजकूर या फ्लेक्सवर लिहिण्यात आला आहे. मनसेच्या कसबा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष गणेश भोकरे यांनी या फ्लेक्स वर ‘पुण्याची पसंत मोरे वसंत’ असे देखील लिहिले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा लढविण्यासाठी मोरे यांचे तिकीट फिक्स केलंय का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.