पौड – पौड परिसरात गणेश मंडळे आणि घरातील गौरी गणपतीचे भरपावसात साधेपणाने विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषणांनी मुळाकाठ दुमदुमून गेला होता.
पौड गावात दुपारी चार वाजेपर्यंत घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन झाले. पौड येथील मुळानदीकाठी विसर्जनासाठी भाविक गणेशमूर्ती घेऊन येत होते; मात्र दुपारी चारनंतर वरूणराजाने हजेरी लावली. संततधार बरसत असलेल्या पावसातही भाविकांचा उत्साह कोठेही कमी झाला नव्हता. पौड येथे असलेल्या मानाच्या दिगंबरनाथ तरूण मंडळाने आळंदी लहान मुलांचे भजन म्हणणारे पथकासह मिरवणूक काढली होती.
भजन म्हणणाऱ्या लहान मुलांनी भरपावसात मिरवणूकीत सर्वाची मने जिंकून घेतली. दिगंबरनाथ मंडळाच्या गणपतीचे सायंकाळी सात वाजताच विसर्जन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सचिन शेरेकर यांनी दिली. भोईराज तरूण मंडळाने स्वतःचेच ढोल पथक मिरवणुकीत उतरविले होते. तर पौड गावातील गोकुळपूरा तरूण मंडळ, अखिल बाजारपेठ तरूण मंडळ, जय हनुमान तरूण मंडळ आणि श्रीमंत गणराज मित्र मंडळाने मात्र भर पावासात डीजेच्या खणाखणाटावर नृत्यांचा ठेका धरला.
रात्री दहा वाजेपर्यंत पौडमधील सर्व मंडळाच्या गणपतीचे विसर्जन पूर्ण झाले असल्याची माहिती सरपंच प्रमोद शेलार आणि पोलीस पाटील संजय पिंगळे यांनी दिली. विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ कामथे, पोलीस नाईक संतोष दावलकर, सचिन सलगर, आनंदा बाठे, बाबा शिंदे, नवनाथ शिंदे, अक्षय यादव इतर पोलीस व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त बजावला.