शिरूर तालुक्‍यातून वरद शिंदे पहिला फायटर वैमानिक

मुख्याध्यापक संघाच्या वतीने सन्मान

शिक्रापूर-येथील वरद संपत शिंदे हा भारतीय नौदलाच्या (इंडियन नेव्ही) सिलेक्‍शन बोर्डाच्या वतीने सप्टेंबर 2019 नुसार घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाला असून या युवकाची भारतीय नौदलात फायटर पायलट या पदावर निवड झाली आहे. फायटर वैमानिक होणारा वरद हा शिरूर तालुक्‍यातून पहिलाच आहे.

वरद शिंदे याने इयत्ता दहावीचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय येथे तर बारावीचे शिक्षण विद्याधाम प्रशाला शिरूर येथे पूर्ण केले. त्यानंतर बी.टेक. पदवी राहुरी विद्यापीठात पूर्ण केल्यानंतर पहिल्या प्रयत्नातच त्याने हे यश संपादन केले आहे. वरदला सुरुवातीपासूनच खेळाची आवड होती. राष्ट्रीय स्तरावर कराटे स्पर्धेत सहभाग घेत चमकदार कामगिरी करत अनेक पारितोषिके त्याने पटकावली आहेत. तर नौदलात वैमानिक पदावर जाण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल त्याने या यशाचे श्रेय आई अंजली शिंदे व वडील संपत शिंदे आणि गुरुजनांना दिले. वरदच्या या यशाबद्दल शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य रामदास थिटे, सहसचिव अशोक सरोदे, उपाध्यक्ष वाल्मिकराव बांदल, पदाधिकारी संजय देशमुख, बाळासाहेब चव्हाण, संजीव मांढरे, सतिश बनकर आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.

  • युवकांनी या क्षेत्राची माहिती घ्यावी – प्रा. रामदास थिटे.
    शिक्रापूर येथील वरदचे यश हे तालुक्‍यातील युवकांना प्रेरणादायी असून वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रापलीकडेही व्यावसायिक क्षेत्र आहेत. नौदल, वायुसेना व अन्य क्षेत्रात विद्यार्थी करिअर करू शकतात, हे याद्वारे सिद्ध झाले आहे. शिरूर तालुक्‍यातील युवकांनी या क्षेत्राची माहीती घ्यावी असे प्राचार्य रामदास थिटे यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.