शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे बंद असलेले घर बनावट चावीने उघडून घरातील सुमारे चार लाख रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याची घटना घडली असून शिक्रापुर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत गणेश सदाशिव भुजबळ (रा. तळेगाव ढमढेरे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यत फिर्याद दिली. गणेश भुजबळ यांची आई आजारी असल्यामुळे त्यांच्यावर आळंदी येथे उपचार सुरु होते. त्यामुळे गणेश भुजबळ पंधरा दिवस बाहेर होते, भुजबळ हे घरी आले असताना त्यांना घराचा दरवाजा बनावट चावीने उघडला असल्याचे दिसून आले. त्यांनी घरात पाहणी केली असता घरातील कपाटात ठेवलेले एक लाख चाळीस हजार रुपये व सुमारे अडीच लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी गेले असल्याचे आढळून आले. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक देविदास दगडे हे करीत आहेत.