- जुन्या सर्व मार्गांसोबत काही नवीन मार्गांवरही एसटी सेवा सुरु
पिंपरी – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड (एसटी) वल्लभनगर आगार पुन्हा गर्दीने गजबजत आहे. आगारातील बहुतांश सर्व एसटी मार्गावर सुरु झाल्या आहेत. तसेच, एसटी प्रशासनाच्या वतीने नवीन काही मार्गावर फेरी सुरु करण्यात आल्या आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. पुन्हा उद्योगनगरीतील उद्योग सुरु होत असल्याने कामगार शहरात येत आहेत. तर, नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे अजून प्रवाशांची भर पडत असल्याचे आगार प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
करोनामुळे एसटीला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. मात्र, आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने वल्लभनगर आगारातून राज्यातील विविध भागात बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. आजघडीला आगरातून 85 टक्के एसटी बस मार्गावर धावत आहेत. गेल्या काही दिवसांपासून एसटी स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे एसटी आगारातील प्रवाशांच्या संख्येत तुलनेने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे आगारातून नुकतीच विविध मार्गावर नव्याने बस सेवा सुरु करण्यात आली आहे. कोकण, सोलापूर, कोल्हापूर यासह रेणापूर या मार्गावरही एसटी धावत आहे. वल्लभनगर आगारात एकूण सुमारे 56 लालपरी 2 शयनयान व शिवनेरी बस आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद बघून बस वाढवण्यात येतील, अशी माहिती आगार प्रशासनाकडून देण्यात आली आहे.