शिक्रापूर पोलिसांकडून तळेगावात धरपकड
तळेगाव ढमढेरे-या परिसरातील शाळा, विद्यालय आणि महाविद्यालय आवारात मोकाट फिरणाऱ्या रोडरोमिओंवर आज शिक्रापूर पोलिसांनी मोटार वाहन कायदा आणि मुंबई पोलीस कायद्यांतर्गत कारवाई केली असल्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांनी सांगितले.
आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येतो. यामध्ये युवक-युवती यांच्यामधील संवाद आणि संवादाचे रूपांतर प्रेमाचा प्रस्ताव मांडले जातात. यामधून होणारा वाद हा युवक गटातील हाणामारीपर्यंत पोहचत असल्याचे प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली. शाळा व महाविद्यालय अशी कोणताही संबंध नसणारे युवक या परिसरात येऊन बेकायदेशीर समूह करतात गोंधळ घालतात. त्यामुळे वेळोवेळी भांडणाचे प्रकार घडतात. यातून दोन गटात मारामारीचे प्रकारामध्ये वाढ झाली असून यावर कारवाई करण्याची मागणी संस्थेची होती. या परिसरात युवतींना पाहून गाड्या जोरात चालवणे, कर्कश हॉर्न वाजवणे, गाड्यांचा विचित्र आवाज काढणे, गाडीच्या नंबर प्लेटवर नाव टाकणे अशा विविध प्रकारच्या कल्पना करतात.
यावर कारवाई करण्यासाठी शिक्रापूर पोलीस ठाण्यांतर्गत सकाळपासून शाळा आणि महाविद्यालयच्या मुख्य द्वारावर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी थांबून होते. यावेळी गाड्या थांबवून चौकशीअंती ज्या विद्यार्थ्यांकडे शाळेचे आयकार्ड नव्हते त्यांचे कॉलेज प्रशासनाकडे कारवाई करण्यासाठी नावे दिली आहेत. ज्यांच्याकडे वाहन परवाना नसेल त्यांना मोटार वाहन कायदा अंतर्गत दंड आकारले. तसेच कॉलेजबाहेरील मुलांवर मुंबई पोलीस कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली.
- तळेगाव ढमढेरे परिसरातील शाळा, विद्यालय आणि महाविद्यालय या परिसरात येऊन गोंधळ घालून भांडणे करत असेल आणि कोणीही गाडी जोरात चालवताना दिसला किंवा कर्कश हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणार.
-राजेश माळी, पोलीस उपनिरीक्षक शिक्रापूर - शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे संस्थाचालक, प्रशासन व कर्मचारी शालेय व महाविद्यालयीन शिस्तीबाबत नेहमीच सजग असतात; परंतु अलीकडच्या काही दिवसात शाळा व महाविद्यालयाशी कोणताही संबंध नसणारे युवक शिक्षण संस्था परिसरात येऊन गोंधळ घालणे, भांडण करणे असे गैरप्रकार करत असल्याचे निदर्शनास येत होते. अशांवर कडक कारवाई करण्याची मागणी संस्थेने केली होती. त्यास अनुसरून आजची कारवाई झाल्याने शैक्षणिक वातावरणास बाधा आणणारे प्रकार थांबतील असा विश्वास वाटतो.
-माणिक सातकर, प्राचार्य आर. बी. गुजर प्रशाला
-डॉ. पराग चौधरी, प्राचार्य साहेबराव ढमढेरे महाविद्यालय