लसीकरण विभागाने मागवली जिल्हा, महापालिकांकडून संभाव्य लाभार्थ्यांची संख्या
पुणे – करोनावरील प्रतिबंधक असलेल्या लसीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असून, प्रत्येक जिल्हा आणि महापालिकांकडून 20 मार्च पर्यंतच्या संभाव्य लसीकरणाची माहिती राज्याच्या लसीकरण विभागाने मागवली आहे. त्यामध्ये खासगी रुग्णालय आणि सरकारी रुग्णालय यामध्ये दिल्या जाणाऱ्या डोसचा समावेश करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होऊन नऊ दिवस झाले आहेत आणि ज्येष्ठांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क डोस देण्याला सुरूवात झाली आहे. मात्र आता लस मिळत नसून, त्याचा तुटवडा असल्याची तक्रार स्थानिक स्वराज्य संस्थांकडून होऊ लागली आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेवर परिणाम होईल की काय अशी शंका निर्माण झाली आहे.
महापालिकेला आजपर्यंत 2 लाख 22 हजार 800 लस मिळाल्या असून, त्यातील 1 लाख 98 हजार 930 लसींचे वाटप झाले आहे. सध्या महापालिकेकडे 23 हजार 870 लस शिल्लक आहेत. महापालिका आणि खासगी रुग्णालय मिळून सुमारे 70 पेक्षा जास्त केंद्रांवर आता लसीकरण सुरू झाले आहे. प्रत्येक केंद्रावर 100 या प्रमाणे लसीकरण झाले तर दोनच दिवस पुरेल एवढा साठा महापालिकेकडे शिल्लक आहे.
आजपर्यंत संपूर्ण राज्यात 19 लाख 5 हजार 388 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. तसेच राज्याला मिळालेल्या लसींचे आधीच संपूर्ण राज्यात वाटप झाले आहे. त्यामुळे राज्याकडे लसीचा साठा नाही. त्यामुळेच पुढील लसींच्या मागणीसाठी राज्याने 20 मार्चपर्यंतचे जिल्हा, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडील लसींचे नियोजन आणि त्यांची संभाव्य मागणी यांची माहिती मागवली आहे. त्यामध्ये खासगी रुग्णालयांना दिल्या जाणाऱ्या लसींची माहितीही अंतर्भूत करावी, असे स्पष्टपणे सांगितले आहे.
राज्यात लसीचा तुटवडा नाही, परंतु पुढच्या आठवड्यात लसींचा पुढचा साठा येणार आहे. सध्या संपूर्ण राज्यात खासगी आणि सरकारी रुग्णालय मिळून सेशन वाढल्यामुळे लस तेथे “डिस्ट्रीब्युट’ झाली आहे. मात्र पुढील आठवड्यापर्यंत कोठेही लस कमी पडणार नाही. मुळात उपलब्ध साठ्यानुसारच त्याचे वितरण करावे लागणार आहे. ज्या जिह्यांमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लस कमी पडेल, तेथील आरोग्य अधिकाऱ्यांनी लसींची उपलब्धता (“ऍडजेस्टमेंट’) करून द्यावी.
– डॉ. दिलीप पाटील, राज्याच्या लसीकरण विभागाचे प्रमुख