पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील लस संपल्याने लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली होती. त्यामुळे शुक्रवारी लसीकरणामध्ये खंड पडला होता. महापालिका प्रशासनाला करोना प्रतिबंधक लसीचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे उद्यापासून (शनिवार) पुन्हा शहरातील लसीकऱण केंद्रे सुरू होणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली. परंतु शासनाकडून किती लस मिळाल्या आहेत, याचा आकडा मात्र प्रशासनाने गुलदस्त्यात ठेवला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात 59 लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तर 28 खासगी लसीकरण केंद्रामार्फत देखील व्यक्तींना करोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. आजपर्यंत शहरातील एकुण 2 लाख 30 हजार 869 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार लसीकरण केले जात आहे. आज शासनाकडून पुन्हा लसीचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी लसीकरण केंद्रामध्ये येऊन लस घ्यावी असे आवाहन डॉ. साळवे यांनी केले आहे.