- 2072 नवीन रुग्णांची भर
- एकूण मृत्यूने तीन हजारांचा आकडा ओलांडला
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये आज 2072 नवीन रुग्णांची भर पडली. तर 23 जणांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंतच्या एकूण करोना मृत्यूंचा आकडा तीन हजारांच्या पार गेला आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शुक्रवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 2009 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 63 रुग्णांची नोंद झाली. तसेच दिवसभरात 23 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये शहरातील 17 व शहराबाहेरील 6 रुग्णांचा समावेश आहे.
दिवसभरात 1824 रुग्णांना डिस्चार्ज दिला. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 35 हजार 663 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 8169 संशयित रुग्णांची महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 3570 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 4677 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 20,649 वर पोहचली आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 25,326 इतकी आहे.
ड प्रभागात सर्वाधिक रुग्ण
शहरातील ड प्रभागामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आज ड प्रभागामध्ये 415 नवीन करोनाबाधित रुग्णांची भर पडली. ड प्रभागामध्ये पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर हा भाग येतो. याव्यतिरिक्त शहरातील अ प्रभागात 200, क 211, इ प्रभागात 197 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर फ प्रभाग 179, ग 241 व ह प्रभागात 238 बाधित आहेत.
जिल्हा रुग्णालयात 20 करोनाबाधित
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी (दि. 9) 20 करोनाबाधित रुग्ण आढळले. दोन ज्येष्ठ नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.करोनाबाधित रुग्ण हे वडगाव मावळ, पिंपळे गुरव, काळेवाडी, नवी सांगवी, काळभोरनगर, पाषाण, औंध, आळंदी, पिंपळे गुरव, खडकी बाजार, जुनी सांगवी, शितोळेनगर, बारामती, बावधन या परिसरातील आहेत. टाकवे बुद्रुक (मावळ) आणि थेरगाव येथील दोन ज्येष्ठ नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यातील एका ज्येष्ठाचा गुरुवारी तर, एकाचा शुक्रवारी मृत्यू झाला. रुग्णालयातून शुक्रवारी 6 जण बरे होऊन घरी परतले. रामनगर-येरवडा, पिंपळे सौदागर, बावधन, लोणी काळभोर, पिंपळे गुरव येथील हे रुग्ण आहेत. त्यामध्ये 2 पुरूष आणि 4 महिला रुग्णांचा समावेश आहे. पुणे येथील 5, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण येथील प्रत्येकी 3 करोना संशयित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयामध्ये सध्या 68 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 51 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत एकूण 1 हजार 19 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 1 हजार 304 रुग्णांना होम क्वॉरंटाइन केले आहे.