- फक्त मेडिकल, दूध विक्रीला परवानगी
- महापालिकेचा सुधारित आदेश
पिंपरी- राज्य शासनाच्या आदेशानुसार शनिवारी आणि रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये विकेंड लॉकडाऊन लागू आहे. त्यानुसार पूर्णवेळ मेडिकल व दूध विक्री (सकाळी) वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. मात्र, उद्योग, कारखाने शनिवारी आणि रविवारी सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत सुधारित आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
शनिवारी, रविवारी लॉकडाऊन आहे किंवा नाही, याबाबत उद्योजक संभ्रमावस्थेत आहेत. कंपन्या चालू आहेत की बंद, हा प्रश्न विचारला जात होता. मात्र, नियमावलीनुसार उद्योगांना सूट देण्यात आलेली आहे. एमआयडीसी परिसरातील सर्व कारखाने या काळामध्ये सुरु ठेवण्याबाबत सुधारित आदेश काढण्यात आलेले आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देणे, तसेच त्यांची आरटीपीसीआर टेस्ट आणि लसीकरण करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मिनी लॉकडाऊनमधून चष्म्याची दुकाने वगळली
मिनी लॉकडाऊनमध्ये सोमवार ते शुक्रवार पिंपरीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून दुकाने बंद करण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यातून ऑप्टीकल आऊटलेट (चष्म्याची दुकाने) वगळण्याची मागणी ऑप्टीकल ट्रेडर्स असोशिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. त्यावर पालिकेने सोमवार ते शुक्रवार ही दुकाने चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे.