अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्यत्व सोडले;डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

वॉशिंग्टन : अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेसोबतचे सर्व संबंध तोडले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतची मोठी घोषणा केली. जागतिक आरोग्य संघटना ही चीनच्या हातातील बाहुलं आहे. त्यामुळे आम्ही सर्व संबंध तोडत आहोत, असे ट्रम्प यांनी जाहीर केले. दरम्यान कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिकेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनाला सुरुवातीच्या स्तरापासून रोखण्यात जागतिक आरोग्य संघटनेला अपयश आल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. सोबतच चीनवरही चहूबाजूंनी टीका केली. कोरोनाच्या महामारीवरुन ट्रम्प यांनी यापूर्वीही जागतिक आरोग्य संघटनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते.

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसाठी जागतिक आरोग्य संघटना आणि चीन जबाबदार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. तसेच “वार्षिक केवळ 40 मिलियन डॉलर (4 कोटी डॉलर) मदत देऊनही चीनचे जागतिक आरोग्य संघटनेवर नियंत्रण आहे. दुसरीकडे या तुलनेत अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला वार्षिक 45 कोटी डॉलर एवढी मदत करत होती. परंतु आवश्यक उपाययोजना करण्यात अपयश आल्याने आम्ही आजपासून जागतिक आरोग्य संघटनेसोबतचे संबंध संपवत आहोत.” असेही ट्रम्प यांनी म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला मिळणार निधीही थांबणार आहे. याबाबत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेचा रोखलेला निधी आता जगातील इतर आरोग्य संघटनांच्या मदतीसाठी वापरला जाईल, तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसचा उल्लेख वुहान व्हायरस असा केला. चीनने वुहान व्हायरसबाबत माहिती लपवून कोरोना संपूर्ण जगभरात पसरण्याची परवानगी दिली. यामुळे जागतिक महामारी आली आणि एक लाखांपेक्षा जास्त अमेरिकन नागरिकांचा जीव घेतला. संपूर्ण जगभरात लाखो नागरिकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.