वॉशिंग्टन – युक्रेनवर हल्ला केल्याबद्दल रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिीर पुतीन यांच्यावर अमेरिकेने अनेक निर्बंध घातले आहेत. त्याबरोबर पुतीन यांच्या दोन कन्यांवरही अमेरिकेने निर्बंध घातले आहेत.
रशियाच्या आर्थिक व्यवहारांबरोबरच रशियाची आंतरराष्ट्रीय पत धोक्यात आणण्यासाठीच अमेरिकेने या संदर्भात पुतीन यांच्या दोन्ही कन्यांवरही बंदी घातली आहे. अमेरिकेने रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लावरोव्ह आणि माजी पंतप्रधान मेडवेदेव यांच्या कुटुंबावरही निर्बंध घातले आहेत.
या मान्यवरांनी रशियाच्या जनतेच्या करांच्या जोरावर स्वतः मानाचे स्थान मिळवले आहे. यापैकी काही जणांनी रशियाने युक्रेनविरोधात सुरू केलेल्या युद्धाला पाठिंबा मिळवून देण्यासाठी कामही केले आहे, असे व्हाईट हाऊसने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मारिया वोरोंत्सोवा आणि कतरिना तिखोन्वोवा या पुतीन आणि त्यांच्या प्रथम पत्नी ल्युडमिला श्केबनेवा यांच्या कन्या आहेत. मात्र या दोघांचा 2013 मध्ये घटस्फोट झाला आहे.
पुतीन यांच्या दोन्ही कन्यांबद्दल आतापर्यंत फारसे कोणालाच माहिती नव्हते. पुतीन फारच कमीवेळा या दोघींबरोबर दिसून आले आहेत. 2015 मध्ये पुतीन यांनी प्रथमच आपल्या दोन्ही कन्यांचा सार्वजनिकपणे उल्लेख केला होता. मारिया वोरोत्सोवा ही नोमेंको या खासगी गुंतवणूक कंपनीची सहमालकीण आहे. तर कतरिना तिखोन्वोवा ही डान्स स्पर्धक आहे. ती सध्या मॉस्कोमध्ये आर्टिफिशयल इन्टिलिजन्स इन्स्टिट्युट चालवते आहे.