न्युयॉर्क :- अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला गटात जागतिक क्रमावरीत अव्वल स्थानी असलेल्या पोलंडच्या इगा स्वेटेकने , तसंच पुरुष गटात या स्पर्धेतील तीन वेळा विजेता ठरलेल्या नोवाक जोकोवीचने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
स्पर्धेत पुरुषांच्या एकेरीत सर्बियाचा स्टार टेनिसपटू व यंदाच्या स्पर्धेचा संभाव्य विजेता नोवाक जोकोवीचने स्पेनच्या बार्नेब मिलार्सवर 6-4, 6-1, 6-1 अशी सरळ तीन सेटमध्ये मात केली. यजमान अमेरिकेच्या फ्रान्सिस तैफुनेही स्पर्धेत आगेकूच करताना ऑस्ट्रीयाच्या सॅबेस्टीयन ओफ्नरवर 6-3, 6-1, 6-4 अशी मात केली.
बोपण्णा-एब्डेनची विजयी सलामी
भारताच्या रोहन बोपण्णाने यंदाच्या स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरीत ऑस्ट्रेलियाचा सहकारी खेळाडू मॅथ्यु एब्डेनसह विजयी सलामी दिली. या जोडीने पहिल्या फेरीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस्तोफर कोनेल व अलेक्झांडर युकीक या जोडीवर 6-4, 6-2 असा विजय मिळवला व दुसरी फेरी गाठली.
महिला एकेरीत स्वेटेक तिस-या फेरीत…
पोलंडची व्यावसायिक टेनिसपटू इगा स्वेटेकने येथे सुरू असलेल्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिलांच्या एकेरीत तिसरी फेरी गाठली. तिने दुसऱ्या फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दारीया सेव्हीलवर 6-3, 6-4 अशी सहज दोन सेटमध्ये मात केली.
महिलांच्या एकेरीतील अन्य लढतीत यजमान अमेरिकेच्या कोको गॉफनेही आगेकूच करताना रशियाच्या मायरा आंद्रेव्हाचा 6-3, 6-2 असा पराभव केला. चीनच्या वॅंग झियू हिने स्पेनच्या सारा ट्रोमोवर 5-7, 6-3, 6-4 असा विजय मिळवला.
रशियाच्या एलिना रायबान्काला ऑस्ट्रेलियाच्या अज्ला टोमजानोव्हीकडून पुढे चाल मिळाली. अल्जाने दुखापतीच्या कारणाने सामन्यातून माघार घेतली. चेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्विटोव्हाला डेन्मार्कच्या कॅरोलिन ओझीयांकीकडून 7-5, 7-6 असा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला.