Gurpatwant Singh Pannun – खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नून याच्या हत्येच्या फसलेल्या कटाचा तपास करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा विषयाचे उप मुख्य सल्लागार जोनाथन फिनर भारतात दाखल झाले आहेत. दोन्ही देशांनी मिळून एक प्रगल्भ संपर्क प्रस्थापित केले आहेत.
परस्परांशी असलेल्या संधी आणि मतभेदांबाबत काम करण्यासाठी हे प्रगल्भ संपर्क उपयोगी येणार आहेत, असे फिनर यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीत झालेल्या तंत्रज्ञानविषयक परिषदेदरम्यान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि जोनाथन फिनर यांनी संबंधांचा पुनरुच्चार केला.
भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या संबंधांमध्ये संरचनात्मक दृढता असल्याचे जयशंकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
फिनर यांनी आज सकाळी जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. अमेरिकेत खलिस्तानी नेता गुरपतवंत सिंग पन्नून याच्या हत्येच्या फसलेल्या कटाच्या तपासासंदर्भात या दोघांशी चर्चा झाल्याचे समजते आहे.
दोन्ही देशांमध्ये काही गुंतागुंतीचे विषय आहेत. भूराजकीय आणि आर्थिक मुद्यांशी संबंधित या विषयांबाबत चर्चा होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यानिमित्ताने सांगितले. मात्र दोन्ही देशांदरम्यान कोणते मुद्दे मतभेदाचे आहेत, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.
पन्नूनच्या हत्येचा कट अमेरिकेत उधळला गेला आणि त्या संदर्भात एका भारतीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या कटात भारत सरकारच्या एका कर्मचाऱ्याचा थेट सहभाग असल्याचा आरोप अमेरिकेच्या तपास संस्थेकडून झाल्यानंतर थोड्याच दिवसात व्हाईट हाऊसचे वरिष्ठ अधिकारी भारतात दाखल झाले आहेत.