बगदाद – अमेरिकेने इराक आणि सीरियातील इराण समर्थक गनिमांच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले केल्याचे वृत्त आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे हल्ले सुरू असून त्यात किमान पंधरा इराण समर्थक गनिम ठार झाल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यांना गनिमांनीहीं रॉकेट हल्ले करून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला पण त्यातून अमेरिकेचे काहीही नुकसान झालेले नाही. अमेरिकेचे सैन्य बगदाद मध्ये ज्या इमारतीत वास्तव्याला आहे त्या इमारती नजिक गनिमांनी चार रॉकेट हल्ले केले.
अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांच्या संबंधात जी माहिती मिळाली आहे त्यानुसार अमेरिकेच्या सैन्यांनी गनिमांच्या ठिकाणांवर दोन्ही देशांमध्ये किमान 50 रॉकेट्स डागली आहेत. त्यात गनिमांच्या ठिकाणांचे मोठे नुकसान झाले आहे. हशेद अल शाबी असे तेथील प्रमुख इराण समर्थक संघटनेचे नाव आहे. कताईब हिजबुल्लानावाची संघटनाही अमेरिकेच्या विरोधात हिंसक कारवाया करीत असल्याने त्या संघटनेच्या इराकमधील पाच ठिकाणांवर अमेरिकेने रॉकेट्स डागली.
आमच्या या हल्ल्यांमुळे या गनिमांची आमच्यावर हल्ला करण्याची संभाव्य शक्ती नाहीशी करण्यात आम्हाला यश मिळाले आहे असा दावा अमेरिकेच्या लष्कराकडून करण्यात आला आहे. अमेरिकेने इराकमधून आपले काढता पाय घ्यावा अशी या इराण समर्थक गनिमांची मागणी आहे. त्यासाठी ते या हिंसक कारवाया करीत आहेत.