पुणे -शहरासह जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्या तुलनेत रुग्णालयातील मनुष्यबळ अपुरे ठरत आहे. यामुळे जिल्हा परिषदेकडून महिन्याभरात तब्बल 1 हजार 351 एमडी, एमबीबीएस डॉक्टरांसह वैद्यकीय अधिकारी यांच्यासह नर्स, आरोग्य सेविका, क्ष-किरण तंत्रज्ञ यांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये मागील पंधरा दिवसांत 8 एमडी डॉक्टर आणि 50 हून अधिक एमएबीएस डॉक्टरांची भरती केली आहे.
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरासह ग्रामीण भागात करोनाची दुसरी लाट सुरू झाली. अवघ्या महिन्याभरात या लाटेने जिल्ह्यात कहर माजवायला सुरवात केली. विशेषत: ग्रामीण भागात बाधितांची संख्या दुप्पट ते तीप्पटीने वाढू लागल्यामुळे उपचारासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली. अशा परिस्थितीत ग्रामीणमध्ये रुग्णांना उपचार देताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य विभागावर मोठा ताण येत आहे.
पुरेशे मनुष्यबळ नसल्यामुळे कोवीड सेंटरही बंद ठेवले. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, आरोग्य सभापती प्रमोद काकडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्याचा निर्णय घेतला होता. 10 एमडी डॉक्टर, 64 एमबीबीएस, 64 बीएएमएस डॉक्टर, 54 जीएनएम 169, एएनएम 648, 115 डाटा ऑपरेटर, 18 तंत्रज्ञ, 5 इसीजी तंत्रज्ञ यांची नियुक्ती केली आहे.
तालुकानिहाय मनुष्यबळ
आंबेगाव – 85, बारामती – 159, भोर – 66, दौंड – 94, हवेली – 84, इंदापूर – 120, जुन्नर – 108, खेड – 115, मावळ – 54, मुळशी – 34, पुरंदर – 96, शिरूर – 116, वेल्हा – 71, विप्रो (हिंजवडी) – 136,परिषद मुख्यालय 13.
===============