पुणे : पती आणि सासू सासऱ्या विरुद्ध विवाहितेने सहा वर्षे उशिरा दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात सासू-सासर्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी मंजूर केला.
तक्रारदार पत्नी कॅनडामध्ये राहते. तर पती ऑस्ट्रेलियामध्ये राहतो. तिचे सासू-सासरे पुण्यात राहतात. त्यांच्याविरुद्ध तिने कौटुंबिक हिंसाचार कायद्या अंतर्गत सहा वर्षे उशिरा पोलिसांकडे चार मार्चला फिर्याद दाखल केली होती.
या प्रकरणात संबंधित सासू-सासर्यांनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून डॉ. चिन्मय भोसले, ऍड. तुषार बोराडे, ऍड. कमलेश गावडे यांच्यामार्फत अर्ज केला होता.
या प्रकरणा मध्ये संबंधित तक्रारदार महिलेने पती आणि सासू-सासर्यां विरुद्ध कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये कलम 323, 377, 420, 498 – अ, 504 506 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अर्जदार महिलेचे 2013 मध्ये लग्न झाले होते. 2014 साली तिने पती व सासू सासऱ्या विरुद्ध दावा दाखल केला होता. त्यानंतर ती मे 2019 मध्ये कॅनडा येथे नोकरी करण्यासाठी गेली होती.
पती आणि सासू-सासर्यांनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार तिने चार मार्चला कोथरूड पोलिसांकडे दाखल केली होती. संबंधित अर्जदार महिला ही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.
त्रासाची तक्रार करण्यासाठी तिने सहा वर्ष उशीर केला. सुशिक्षित असलेल्या महिलेला तक्रार करण्यासाठी इतकी वर्षे लागणार नाहीत. सहा वर्षांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिच्या पतीने जानेवारी 2017 मध्ये घटस्फोट मिळावा म्हणून दावा दाखल केला आहे. सासू-सासरे तिच्याबरोबर गेली सहा वर्षे राहतच नसल्यामुळे तिला त्रास देण्याचा प्रश्नच येत नाही, त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा असा युक्तिवाद डॉ. चिन्मय भोसले यांनी न्यायालयात केला.
यापूर्वी 2015 मध्ये ती पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेली असता तक्रारीत तथ्य नाही हे पाहून तिची तक्रार घेण्यात आली नव्हती. या प्रकरणात तेव्हा अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून संबंधितांनी कोर्टात अर्ज केला होता. तेव्हा कोर्टाने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यापूर्वी 72 तास आधी नोटीस देण्यात यावी असा आदेशही दिला होता.