बेंगळुरू – प्रो कबड्डी लीगमध्ये एका रोमांचक लढतीत यूपी योद्धाने यू मुंबावर 35-28 असा पराभव केला. या विजयाच्या जोरावर यूपी योद्धाने प्लेऑफमध्ये (बाद फेरी) प्रवेश केला असून यू मुंबाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
यू मुंबा स्पर्धेबाहेर होणारा चौथा संघ ठरला आहे. या स्पर्धेत यंदा चौथ्यांदा यूपी योद्धाचा संघ खेळत आहे. या चारही वर्षी या संघाने बाद फेरीत प्रवेश केला आहे. अशी कामगिरी करणारा स्पर्धेतील एकमेव संघ ठरला आहे. या सामन्यात परदीप नरवाल अपयशी ठरला. त्याला या सामन्यात अवघे 6 गुण नोंदवता आले. सुरेंदर गिलने सर्वाधिक 7 रेड पॉइंट्स केले.
पूर्वार्धानंतर यूपी योद्धाने यू मुंबाविरुद्ध 18-12 अशी आघाडी घेतली. नरवालने धडाक्यात सुरुवात केली आणि त्याने सुपर रेडसह तीन गुण पटकावले. यू मुंबानेही लढत देत थाटात पुनरागमन केले आणि व्ही. अजित कुमारनेही वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, यूपी योद्धाने अफलातून आक्रमण करत पहिले सत्र संपण्यापूर्वी यू मुंबाला ऑलआऊट केले व स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला.
दुसऱ्या सामन्यात बेंगळुरू बुल्सने हरयाणा स्टीलर्सचा 46-24 असा पराभव केला. बेंगळुरूचा स्टार आक्रमक खेळाडू पवन सेहरावतने 20 गुणांची नोंद केली व विजयात मोलाचा वाटा उचलला.