हैदराबाद -तेलंगणमधील भाजपचे आमदार टी.राजा सिंह यांच्या विरोधात रविवारी हैदराबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. उत्तरप्रदेशातील मतदारांना उद्देशून धमकीवजा भाषा वापरल्याबद्दल निवडणूक आयोगाच्या आदेशावरून ते पाऊल उचलण्यात आले.
काही दिवसांपूर्वी सिंह यांची एक व्हिडीओ क्लिप प्रसिद्ध झाली. त्या क्लिपमुळे राजकीय वादंग निर्माण झाले. उत्तरप्रदेशच्या मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन करताना सिंह यांनी धमकीवजा भाषा वापरली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हजारों जेसीबी आणि बुलडोझर मागवले आहेत.
भाजपला मतदान न करणाऱ्यांनी ते ध्यानात ठेवावे. उत्तरप्रदेशात रहायचे असेल तर योगी-योगी म्हणावे लागेल हा जेसीबी आणि बुलडोझर मागवण्यामागील हेतू आहे, असे त्यांनी म्हटले. त्या क्लिपची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगाने सिंह यांच्यावर 72 तासांची प्रचारबंदी घातली. त्याशिवाय, सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेशही आयोगाने तेलंगणच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिला. त्या आदेशानुसार सिंह यांच्या विरोधात हैदराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.